
जलसंधारण कृती पंधरवड्याचा समारोप—–भविष्यातील संकटाची चाहूल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाणी नियोजना संदर्भात ठोस पाऊले उचलली आहे. तथापि, त्यांच्या पुढाकारामुळे राज्यातील जल नियोजनात क्रांतीकारी बदल होणार आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी देखील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. यासाठी सिंचन विभागाची भूमिका देखील महत्वपूर्ण राहणार असल्याने आपल्या अखत्यारितील प्रकल्प वेळीच पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्यावतीने १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवडाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून पालकमंत्री बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल फरकाडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार गुप्ता, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेश शर्मा, निम्न वर्धा कालवे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रवीशंकर हरिणखेडे आदी मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, येणा-या काळात जल व्यवस्थापनाचा विषय जगासमोर एक मोठी समस्या म्हणून उभा राहणार आहे. नेहमीच चर्चा होते की, तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल. भविष्यातील संकट ओळखून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासंदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहे. मुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन यांनी त्या दिशेने कार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना राज्यात प्रभावीपणे राबविली होती. या योजनमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासोबतच सिंचन क्षमता देखील वाढली होती. आता मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. सोबतच जलसंधारणच्या माध्यमातून अनेक उपाययोजना आरंभ केल्या आहे. शेतक-यांना सिंचनासाठी पाणी व विज देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सिंचनाच्या योजना राबविताना अनेक अडचणी व संकटे येणार आहे. यावर आपल्याला मात करावी लागेल. सिंचनाच्या कार्यात पाणी वापर संस्थेचे सहकार्य घेण्याची गरज असल्याचे पालकमंत्री भोयर यांनी अधोरेखित केले.सिंचन संदर्भात जो प्रकल्प आपल्या भागात होत आहे. त्यांचे गांभीर्याने नियोजन करा. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देखील कारंजा व आर्वी तालुक्यातील १५ गावातील पशुपालकांना पाणी व चारा टंचाईमुळे गाव सोडून जावे लागते आहे. ही आपल्यासाठी चिंतनाची बाब आहे. यावर ही उपाययोजना करणे निकडीचे आहे. पाणी महत्वाचा विषय असल्याने त्याचे नियोजन करा. नाही तर गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुढील पिछीचा विचार करून प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. याप्रसंगी सिंचन विभागाच्या अधिका-यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा संदर्भात केलेल्या कार्याची माहिती दिली. संचालन सिंचन विभागाच्या वरिष्ठ लिपीक शिल्पा पाटील यांनी तर आभार उप कार्यकारी अभियंता कोमलकर यांनी मानले. कार्यक्रमाला सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.